About Us

     अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील दक्षिण सरहद्दीवर वसलेलं, मुळा व कच नद्यांच्या संगमावर दक्षिणवाहिनी असलेला मुळा नदीच्या कुशीत पुरातन व ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव श्रीक्षेत्र अकलापुर. महाराष्ट्रातील प्रति गाणगापुर म्हणुन प्रसिध्द असलेले लाखो भाविकांचे श्रध्दास्थान स्वयंभु दत्तदेवस्थान.
     इ. स. १२०० पासुन सध्या अस्तित्वात असलेले जुने गावठाण. गावाला पुर्वीपासुन सांप्रदायिक परंपरा, गावात असणारे महान भक्त संत कोंडजीबाबा यांना स्वप्नात साक्षात्कार झाला आणि त्यांनी सर्व गावकऱ्यांना सकाळी एकत्र बोलावून साक्षात्कार वर्णन केला. गावकऱ्यांना बरोबर घेऊन जवळच असलेल्या टेकडीवर उत्खनन केले असता. स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. सर्वांना आश्चर्य वाटले. आणि संपूर्ण गाव आनंदित झाला. तो दिवस होता वैशाख शुध्द द्वादशी. गावकऱ्याच्या सहकार्याने छोटेसे मंदिर बांधून मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या दिवसापासुन आजपर्यंत प्रत्येक वर्षी वैशाख शुध्द द्वादशीला उत्सवाचा कार्यक्रम पार पाडला जातो. पुढे काही दिवसांनी गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला व मोठे मंदिर बांधले. आज गावकऱ्यांच्या सहकार्यातून भव्यदिव्य असे मंदिर उभे राहिले. मंदिराला सभामंडप असुन, सुवर्णकलश आहे. दर गुरुवारी व पौर्णिमेला महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गुरुपौर्णिमा व दत्तजयंती या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक भक्त या दिवशी दर्शनास व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. देवस्थानाच्या विकासासाठी दत्तात्रेय देवस्थान ट्रस्टमार्फत गावकऱ्यांकडुन नियोजन केले जात आहे.
     भाविकांसाठी नियोजन केले जात आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच राहण्याची सोय देवस्थानाच्या माध्यमातून केली जाते. महाराष्ट्र शासणाने देवस्थानाला क वर्ग तीर्थ क्षेत्र दर्जा दिला असुन २५ लाख रुपये खर्च करुन सभा मंडप उभारला आहे. मंदिर परिसरात वृक्षारोपन करुन बगीचा तयार केला आहे. अनेक भाविक नेहमी दर्शनास येत असतात. भाविकांसाठी भोजन व निवासाची सोय करण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या खासदारांचा निधी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी मा. ना. मधुकररावजी पिचड साहेब यांच्या निधीतुन तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी ना. बाळासाहेब थोरात यांच्या निधीतुन मंदिरे परिसरात इमारती उभ्या राहिल्या आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
     २९ नोव्हेंबर २००३ रोजी मंदिराला ग्रामस्थांच्या व अनेक दानशुर देणगीदारांच्या सहकार्याने सुवर्णकलश बसविण्यात आला आहे. प. पु. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते ना. मधुकररावजी पिचड साहेब व ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. संत निवृत्तीनाथ महाराज व ज्ञानेश्वर माऊली, सोपानकाका, मुक्ताई पैठणीतुन आळंदीकडे जात असताना त्यांच्या समवेत रेडा होता. त्याच्यासह सर्व संतमंडळीनी जवळच असलेल्या पुरातन श्री. सिध्देश्वर व दत्तमंदिर परिसरात वास्तव्य केले आहे, अशी अख्यायिका आहे. पुढे सर्व संतमंडळी रेड्यासमवेत आळे (ता. जुन्नर) या गावाकडे मार्गस्थ झाली.




     नाथ संप्रदायातील सर्व नवनाथ तीर्थयात्रा करीत असताना याच टेकडीवर थांबले. त्या वेळी दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिले. ती टेकडी आज अनसुया टेकडी म्हणुन प्रसिध्द आहे. अशाप्रकारे पौराणीक व ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गाव येथे येण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गापासुन ७ किलोमिटरवर बोटा व घारगावापासुन रस्ते आहेत.
     सर्व ग्रामस्थ आज गावात अनेक सण उत्सव जयंतीला आदि उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतात. सर्व समाजातील लोक एकत्र येतात. व सर्व कार्यक्रम साजरे करतात. आरतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊन विचाराची देवाण-घेवाण होत असताना गावची प्रगती अतिशय चांगली आहे. गावचा विकास झालेला असुन अनेक तीर्थक्षेत्रांवर दत्त देवस्थांनाच्या माध्यमातुन दिंडी सोहळे जातात. तसेच ग्रामस्थ धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे करतात. मंदिर परिसरात नामसंकिर्तन व अन्नदान नेहमी होत आहे. बऱ्याच भाविकांनी अन्नदायनासाठी नावे नोंदविली आहेत. साधारणतः ४ वर्षे अन्नदान करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. अनेक भक्तमंडळीनां दत्तमहाराजांचा प्रसाद मिळाला असल्यामुळे अनेकांचे ते श्रध्दास्थान आहेत. दर्शनासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते.
     देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने सर्व भाविकांना सुविधा पुरविल्या जातात. महाराष्ट्र शासणाने देवस्थानाला ब वर्ग दर्जा द्यावा ही मागणी शासणाकडे करण्यात आली आहे. तरी वाचक हो, आपणही एक दर्शनास येऊन आरतीचा लाभ घ्यावा, ही विनंती. महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार, प्रवचनकार तसेच सामाजिक, राजकिय, धार्मिक मान्यवर मंडळींनी भेटी दिलेल्या आहेत. अनेक भक्तमंडळी गुरुवारी व पौर्णिमेस अभिषेक करण्यासाठी व आरतीचा लाभ घेण्यासाठी ये-जा करतात. महाराष्ट्र शासणाने या क्षेत्रास लवकरच ब वर्ग दर्जा देऊन या क्षेत्राची प्रगती व्हावी. हीच अपेक्षा.